top of page
Search

कॉम्प्युटर सायन्स शिक्षणाचा शालेय स्तरावर समावेश आणि भविष्याचा वेध

Updated: Apr 10, 2023


- By Prajakta Jadhav, Project Associate


कोणत्याही देशाचे खरे भविष्य हे त्या देशातील शाळकरी मुलांमध्ये घडत असते. ज्या क्षमतेने ही शाळकरी मुले विकसित होतात त्याच वेगाने देशाची देखील प्रगती होते. यामुळेच या शालेय विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण उपलब्ध होणे गरजेचे आहे. कॉम्प्युटर ,लॅपटॉप आणि स्मार्टफोन या कधीतरी अगम्य वाटणाऱ्या गोष्टी आज आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. आता जर तंत्रज्ञान या वेगाने बदलत असेल तर त्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी आपल्याला आणि विशेषतः येणाऱ्या पिढ्यांना सज्ज करणं ही काळाची गरज आहे.


शालेय शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत अग्रगण्य भूमिका बजावत असतं, अशावेळी या अत्याधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाची महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये काय स्थिती आहे हे आपण थोडक्यात पाहूया.

महाराष्ट्रातील जवळपास ७२.३ % शाळांमध्ये कॉम्प्युटर लॅब उपलब्ध आहे त्यापैकी ६८% कॉम्प्युटर हे चालू स्थितीत आहेत. इंटरनेट बाबत बोलायचे झाल्यास केवळ २८.३ % सरकारी शाळांमध्ये इंटरनेट सुविधा आहे.

अर्थात ही माहिती २०२१-२२ या वर्षासाठी आहे आणि आपण आशा करूयात की चालू वर्षासाठी ही टक्केवारी अजून वाढलेली असेल.


महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील कॉम्प्युटर सायन्स बाबतची सद्यस्थिती पाहता आपल्याला असं लक्षात येईल की,शाळांमध्ये अद्यावत आणि चालू स्थितीत कॉम्प्युटर लॅब असण्याचे प्रमाण हे तुलनेने फारच कमी आहे. जिथे हा कॉम्प्युटर लॅबसेट अप आहे, त्या शाळांमध्येही प्रशिक्षित शिक्षक असण्याचे प्रमाण नगण्य आहे.


बऱ्याचदा वर्गशिक्षक किंवा इतर विषयांचे शिक्षक यांच्यावरच कॉम्प्युटर शिकविण्याची जबाबदारी येते मग अशा वेळी खरंच ते शिक्षक तंत्रस्नेही आहे का?, पेंट आणि गेम या व्यतिरिक्त ते विद्यार्थ्यांच्या कॉम्प्युटर सायन्स बद्दलच्या संकल्पना आणि क्षमता ते विकसित करू शकतील का? कॉम्प्युटर सायन्स हा विषय क्लिष्ट आहे आणि तो आपल्याला सहज शक्य नाही अशी भावना विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये निर्माण होईल का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात.कॉम्प्युटर सायन्स शिक्षणासाठी गरजेच्या असणाऱ्या भौतिक पायाभूत सुविधा या महत्वाच्या आहेतच,पण बऱ्याचदा कॉम्प्युटर सायन्स संदर्भात सोपे आणि स्थानिक परिभाषा असणारे प्रशिक्षण शिक्षकांना उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना स्वतःला इच्छा असूनही या विषयाला अनुसरून अध्ययन आणि अध्यापन करण्यात अडचणी निर्माण होतात. नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे आपल्याला या सगळ्यामध्ये मार्गदर्शक आणि सहाय्यक ठरत आहे. नवीन शैक्षणिक धोरणात जी नाविन्यपूर्ण मार्गदर्शक तत्वे आहे,त्यातीलच एक म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना भविष्यवेधी करण्यासाठी २१व्या शतकातील कौशल्यांचा वर्ग अध्यापनामध्ये समावेश.


आपण आता २१व्या शतकातील कौशल्ये म्हणजेच सर्जनशील विचार क्षमता, सहयोग म्हणजेच एकत्र येऊन काम करण्याची क्षमता,प्रभावी संवादकौशल्य यांचा विद्यार्थ्यांच्या भविष्यवेधी जडणघणीसाठी शैक्षणिक धोरणात केलेला समावेश नक्कीच कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर ही कौशल्ये कोणत्या माध्यमातून आणि कशा प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील याचा आढावा घेणेही तितकेच क्रमप्राप्त आहे. तंत्रस्नेही शिक्षकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी कॉप्म्युटर सायन्स कसे सहाय्य्यभुत ठरू शकते हे शिक्षकांपर्यंत पोहोचवले पाहिजे.


कॉम्प्युटर सायन्स मधील संकल्पना शिकविण्यासाठी कॉम्प्युटर आणि इंटरनेट यांची आवश्यकता असते हा काहीसा गैरसमज शाळांमध्ये आणि विशेषतः शिक्षकांमध्ये दिसून येतो.

कॉम्प्युटर सायन्स मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने उपयुक्त असणाऱ्या कॉम्पुटेशनल थिंकिंग ,अल्गोरिदम, सिक्वेन्सिंग ,लुपींग या संकल्पना विद्यार्थ्यांना त्यांच्या इतर विषयाच्या अभ्यासात उपयुक्त आहे. मूलभूत गणिती प्रक्रिया जसे की गुणाकार, भागाकार, २अंकी संख्यांची बेरीज-वजाबाकी ,पाढे, सरळव्याज काढणे, भौमितिक आकृत्या काढणे अशा अनेक संकल्पनांमध्ये अल्गोरिदम या कॉम्प्युटर विज्ञानातील संज्ञांचा उपयोग करता येतो. विज्ञानातील जलचक्र,ऑक्सिजनचे चक्र व प्रकाशसंश्लेषण या मध्ये देखील सिक्वेन्सिंग आणि अल्गोरिदम यांचा वापर करता येतो.


अगदी भूगोलासारख्या विषयात सुद्धा सूर्यमाला शिकविताना सूर्याभोवती परिवलन आणि स्वतःभोवती परिभ्रमण करणारे ग्रह हे लूपिंग चे उदाहरण म्हणून देता येईल. क्लिष्ट गणित सोडविताना जसे आपण त्याचे लहान लहान तुकड्यांमध्ये विभाजन करतो त्याप्रमाणे कॉम्पुटेशनल थिंकिंग मधील डिकम्पोजिशनचे उदाहरण देता येईल, मराठी, हिंदी, तसेच इंग्रजी या भाषांमध्ये परिच्छेदाचा सारांश लिहिताना ऍब्स्ट्रक्शन हे संज्ञा विद्यार्थ्यांना शिकविली जाऊ शकते.आता ज्या पद्धतीने आपण नेहमीच्या विषयांची सांगड कॉम्पुटर सायन्सशी कशी घालता येईल हे पहिले त्या अनुषंगाने आपल्या होतकरू आणि तंत्रस्नेही शिक्षकांना जर याचे तांत्रिक आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण सहज रित्या उपलब्ध करून दिले तर नक्कीच त्यांना कॉम्पुटर सायन्स शाळांमध्ये शिकविण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते . शिकण्यासाठी सुलभ असे कमी वेळचे काही कोर्सेस शिक्षकांना उपलब्ध झाले कि जे ते त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार बघू शकतील , त्यांच्या शंकांचे निरसन केले जाऊ शकेल तर शिक्षककांकडून नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळेल. अर्थात हे करत असताना सरकारी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सहाय्य हे गरजेचे आहे.


Amazon Future Engineer आणि Leadership For Equity यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षी ब्लेंडेड (ऑनलाईन-ऑफलाईन संमिश्र) पद्धतीने कॉम्प्युटर सायन्स प्रशिक्षण कोर्सचे आयोजन पुणे जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका शाळांमधील शिक्षकांसाठी केले होते. सदर कोर्समध्ये सहभागी शिक्षकांना ब्लॉक बेस्ड कोडिंगच्या माध्यमातून कॉम्प्युटर सायन्स कसे आत्मसात केले जाऊ शकते, हे परिणामकारकपणे सांगण्यात आले. सदर कोर्स ब्लेंडेड स्वरूपात उपलब्ध झाल्यामुळे सहभागी शिक्षकांनी त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार हा कोर्स ऑनलाईन पद्धतीने अतिशय उत्साहाने पूर्ण केला.सोबतच आपापल्या शाळांमध्ये प्लग (कॉम्प्युटर सहित ) तसेच अनप्लग (कॉम्प्युटर विरहित) पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना शिकविले.


ज्यावेळी आम्ही या शिक्षकांना त्यांच्या कॉम्प्युटर सायन्स वर्गात शिकविण्याच्या अनुभवाबद्दल विचारले तेव्हा त्यांचा अभिप्राय हा अतिशय उत्साहपूर्ण होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा कॉम्प्युटर सायन्स शिकण्याचा उत्साह आणि विचार करण्याच्या पद्धतीत झालेला सकारात्मक बदल नमूद केला. अनप्लग पद्धतीने ऍक्टिव्हिटी शिकविल्यामुळे मुले हसत-खेळत विषय शिकू शकतात तसेच सर्जनशील विचार करण्याची त्यांची क्षमता वृद्धिंगत होताना दिसून येते. ब्लॉक बेस्ड कोडिंगकॉम्प्युटर द्वारे शिकताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास होतो आणि आपणही कॉम्प्युटर सायन्स शिकून त्यामध्ये करियर करू शकतो अशी आशा त्यांच्यामध्ये निर्माण झाली.

96 views0 comments

Comments


bottom of page