top of page
Search

शिक्षकांचे किस्से: मनिषा भिसे, पिंपरी चिंचवड

Updated: Mar 6, 2023मी मनिषा भिसे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या, थेरगाव कन्या शाळेतील शिक्षिका. मी इयत्ता चौथीच्या वर्गाला शिकवते. माझा जन्म सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील छोट्याश्या खेडेगावामध्ये झाला. गाव छोट असल्याने तिथे सुख-सुविधा जास्त नव्हत्या परंतू ‘शाळा’ ही आमच्या गावाला मिळालेली देणगीच होती. गावच्या लोकसंख्येपेक्षा माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. माझे उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण याच शाळेत झाले.


परिस्थिती बेताची असल्याने आणि आईची इच्छा असल्याने मी शिक्षण क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. डी. एड. पुर्ण केल्यानंतर सी.ई.टी. मधून उत्तीर्ण होउून नोकरी मिळवणे. हे एकच ध्येय माझ्यासमोर होते. यासाठी दिवसातील १४ ते १८ तास अभ्यास करून मी माझे ध्येय गाठले आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मला शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. याच संधीचे सोने करत ज्ञानदानाचे काम मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत आहे. शिक्षक म्हणून काम करत असतानाच मी माझे एम. ए. बी. एड. पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.शिक्षण हे असे एकच क्षेत्र आहे, ज्यामध्ये आपण पुर्णपणे स्वत:चे ज्ञान इतरांपर्यंत पोहचवू शकतो. लहान मूले मोठे झाल्यानंतर काय करू शकतात हे प्राथमिक शिक्षणावर अवलंबून असते. सर्वांच्या भविष्याचा पाया हे प्राथमिक शिक्षणच आहे. लहान मुलांमध्ये मला रमायला आवडते, मला शिकवायला सूद्धा खूप आवडते.


खरतर मला गणित विषय खूपच आवडतो. मी आता जे काही आहे, ते गणितामुळेच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही; म्हणूनच मागच्या दोन वर्षांपूर्वी ‘गणितमित्र’ उपक्रमाविषयीचा मेसेज वाचला आणि मी लिंक भरली व या उपक्रमामध्ये सहभागी झाले. या कार्यक्रमामध्ये दिलेला प्रत्येक क्षण सार्थकी लागला आहे असे मी म्हणू शकते. या उपक्रमासंदर्भातील ट्रेनिंग, नियोजन व विषयज्ञान खूप प्रगल्भ होते. मी स्वत:ला खूप नशीबवान समजते की, मला या उपक्रमाचा एक भाग बनता आले. लहान मुलांना शिकवण्यासाठी इतकं सखोल ज्ञानाची गरज आहे हे मी त्यातून शिकले. “आडताच नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल?” या उक्ती प्रमाणे आपल्याला एखादा घटक विद्यार्थ्यांसामोर मांडायचा असेल तर तेवढे सखोल विषयज्ञान स्वत:ला असायला हवे याबद्दल विचार केला.या प्रकल्पातुन एखाद्या घटकाचे सखोल ज्ञान सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या कलेप्रमाणे कसे उतरवयाचे, मुलांमध्ये मुलं होऊन कसं शिकवायचे, शैक्षणीक साहित्याचा वापर आणि निर्मिती, घटकांचे नियोजन, विविध खेळ, विविध उपक्रम, लहान मुलांची अभिनययुक्त गाणी अशा एक ना अनेक कितीतरी चांगल्या गोष्टी मी अनुभवल्या, आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.


सर्वात महत्वाचा बदल मी स्वतःमध्ये करून घेतला तो म्हणजे LFE टीमकडे असणारा संयम! सोप्या शब्दात त्यांचा विषय मांडण्याची पद्धत,फॉलोअप घेण्याची पद्धत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचताना मदत होत आहे. ‘गणित मित्र’ उपक्रमातील अनेक बाबी मी माझ्या वर्गातील मुलांसोबत करून बघते आहे, त्यांच्या गुणवत्तेत आणि एखादा घटक यातील संबोध त्यांना स्पष्टपणे समजवण्यास मदत होते. तसेच छोट्या-छोट्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची गणित विषयाची भीती कमी झाली आणि तो विषय आवडीने हाताळू लागली, त्यांची प्रगती मी अनुभवली.


शाळा बंद असूनही शिक्षण चालू ठेवणे तर खूप मोठा टास्क आम्हा सर्वच शिक्षकांपुढे होता; परंतू आमच्या सर्व शिक्षकांना ‘गुगल मीट’ तसेच तंत्रज्ञानातील अनेक बाबींची परिपूर्ण माहिती या टीमने दिली. ऑनलाइन क्लास घेताना येणाऱ्या अडचणी तसेच ऑनलाईन क्लास ऑफलाईन सारखाच कसा होईल यासाठी खूप सार्‍या छोट्या-मोठ्या कल्पकता, बारीक-सारीक गोष्टी आम्हाला शिकवल्या. काम करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विविध चर्चासत्रं त्यांनी ऑनलाइन घेतली त्यामुळे सर्वांच्या अडचणींर चर्चा, विचार विनिमय यांची देवाण-घेवाण झाली.मला असे वाटते की, सार्वजनिक शिक्षण क्षेत्रात प्रामुख्याने कोणतीही जात-धर्म किंवा इतर कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व मुला-मुलींना समान शिक्षण मिळायला हवं. सध्याचे युग हे डिजिटल शिक्षणाचे व तंत्रज्ञानाचे असल्याने सर्वांनी त्याबाबत सखोल ज्ञान सुविधा शासनाने उपलब्ध करून द्यायला हव्यात. तसेच प्रत्येकाच्या बौद्धिक क्षमतेनुसार विविध पद्धतीने शिक्षण दिले जावे. सरकारी शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना सांगू इच्छिते की, आपल्या समोर असणारी ही मुलं वेगवेगळ्या आर्थिक कौटुंबिक परिस्थिती असताना सुरुवातीला आपण त्यांचे पालक होऊन त्यांच्या परिस्थितीची जाणून घेतली पाहिजे.


प्रत्येकाचा बौद्धिक स्तर विचारात घेऊन आपल्या विद्यार्थ्यांनाही तंत्रस्नेही करायला हवे. आपली हीच मुले आपले भावी नागरिक आहेत. त्यांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी शिस्त, विविध मूल्य, संस्कार व बाळकडू आपणच त्यांना आपल्या मुलांप्रमाणे द्यायला हवं विद्यार्थी सुद्धा तंत्रस्नेही असायला हवे आहेत आणि हे आपण सर्व शिक्षकच करू शकतो.

154 views0 comments

コメント


bottom of page