top of page
Search

शिक्षकांचे किस्से: माधुरी बारकूल, पिंपरी चिंचवड

Updated: Mar 6, 2023मी श्रीमती माधुरी बारकूल. सध्या मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सोनावणेवस्ती शाळेमध्ये उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. माझे १२ वी पर्यंतचे शिक्षण माझ्या गावी, म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा या गावी झाले. मला बारावीला सायन्स मध्ये ८४% होते, त्यामुळे मला काहीतरी वेगळे करावेसे वाटत होते. BSc Agriculture करून अधिकारी होण्याचे माझे स्वप्न होते; पण घरच्यांच्या आग्रहामुळे, मुलींसाठी शिक्षण क्षेत्र चांगले व सुरक्षति आहे म्हणून Diploma of Education हा पर्याय निवडला.


माझे D.Ed चे शिक्षण ‘डाएट कॉलेज पुणे’ येथ झाले. मे २०१० मध्ये झालेल्या MHT-CET परीक्षेत मी उत्तीर्ण झाली व शिक्षक म्हणून माझी नियुक्ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झाली. आपले जेव्हा शिक्षण चालू असते तेव्हा परिस्थिती खूप सोपी वाटते, पण प्रत्यक्ष फील्डवर काम करताना विविध समस्या अनुभवयला मिळतात. पालकांची शिक्षणाबद्धल अनास्था, घरचे वातावरण, मुलांच्या वैयक्तिक समस्या, प्रशासकिय कामे , विविध ऑनलाईन कामे व विविध अशैक्षणिक कामे यांमुळे शिक्षकांना मिळणारा वेळ व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता टिकवणे या साऱ्या गोष्टी साध्य करत असताना तारेवरची कसरत करावी लागते.


ही कसरत करत असताना, मी मुलांचा प्राथमिक शाळेचा पाया भक्कम करण्यास, त्यांना सातत्याने गुणवत्तापुर्ण मार्गदर्शन करण्याचा माझा प्राथमिक प्रयत्न असतो. मुलांना शिकवल्यानंतर, जेव्हा त्यांना तो भाग येतो तेव्हा होणारा आनंद हा खरोखरच समाधान देऊन जातो; जो इतर कोणतेच काम केल्याने मिळत नाही.जुन - जुलै २०१९ मध्ये ‘गणित मित्र’ प्रकल्पासंबंधी मुख्यध्यापकांची सभा झाली होती. त्यावेळी आमच्या मुख्याध्यापिकांनी मला या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. त्यावेळी इतर ट्रेनिंग सारखेच हे पण एक ट्रेनिंग म्हणून मी जॉईन केले; परंतू गणित मित्रचे प्रशिक्षण हे अर्थपूर्ण आणि गणितासंबंधी माहिती देणारे वाटले. बेरीज शिकवण्याच्या पद्धती, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचे वेगवेगळे प्रकार, अपूर्णांक, शाब्दिक उदाहरणे सोडविताना येणाच्या अडचणी यांचा अगदी बेसिक लेवलवर केला जाणारा अभ्यास या सर्व गोष्टींमधून खूप शिकायला मिळाले.


गणित विषय आवडीचा आहे पण त्याचे अध्यापन कसे करावे ही मोठी अडचण होती, पण 'गणित मित्र' मुळे अध्यापन सोपे वाटत आहे. प्रशिक्षणाच्या दरम्यान Leadership For Equity यांची टीम वर्गाभेटीसाठी येऊन वर्गाचे निरीक्षण करत, त्यामुळे काय चूक, काय चांगले घडत आहे यासंबंधी चर्चा होऊन, वर्गात काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली. COVID-19 च्या काळात अगदी नव्यानेच ‘ Google Meet व Zoom’ तसेच विविध शैक्षणिक अँप कसे वापरावे यांची माहिती मिळाली. सामाजिक भावनिक शिक्षणाचे आजच्या काळातील महत्व व त्यासंबंधी उपक्रमही नव्याने समजले.


COVID-19 मुळे शिकवणे आणि शिकणे अवघड झाले होते. या परिस्थितीत सर्वात जास्त नुकसान झाले ते फक्त विद्यार्थ्यांचे! कारण एकवेळ आर्थिक नुकसान झाले तर लगेच भरून काढता येईल पण मुलांच्या आयुष्यातील शैक्षणिक नुकसान भरून काढताना खूप वेळ लागणार आहे व खूप मेहनत करावी लागणार आहे. या परिस्थितीत मुलांच्या खूप साऱ्या समस्या अनुभवायला मिळाल्या. आमच्या सोनावणेवस्ती सारख्या औद्योगिक क्षेत्रामध्ये कंपनी बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा काळात शिक्षण कसे चालू ठेवायचे हा प्रश्न शिक्षकांना पडला होता. विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हते. कोणाकडे मोबाईल आहे तर रिचार्जसाठी पैसे नाहीत, काहींकडे साधा मोबाईल तर काहींकडे मोबाईलच नव्हता. या परिस्थितीत शिक्षणाचे शिवधनुष्य पेलण्याची जवाबदारी आमच्या सर्वांचीच होती.


अगदी सुरुवातीला WhatsApp ग्रुप वर अभ्यास पाठवणे , नंतर हळूहळू Google Meet वरती क्लास घेणे चालू ठेवले, पण उपस्थिती जास्त नसायची. मुलांना ऑफलाईन PDF वाटप केले. जे विद्यार्थी गावी गेले होते, त्यांच्याशी फोनवरून संपर्क ठेवला, त्यांना PDF प्रिंट करून घेण्यास सांगितले, गृहपाठ दिला. माझ्याकडे शिष्यवृत्तीचा वर्ग असल्याने COVID-19 ची परिस्थिती सौम्य झाली तेव्हा ४-५ मुलांना शाळेत बोलवून अध्यापन चालू ठेवले. अशा प्रकारे शाळेने केलेल्या नियोजनाप्रमाणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून शिक्षण सुरू ठेवण्याचे काम केले.


आज तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आले आहे. पूर्वीच्याच जुन्या पद्धती पुढील काळात फारश्या उपयुक्त होणार नाहीत. आज भाविष्यवेधी शिक्षणाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून त्याप्रमाणे बदल कृतीत आणवे लागणार आहेत. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचा बोजा कमी करायला हवा जेणेकरून त्यांना पूर्णवेळ विद्यार्थ्यांसोबत घालवता येईल व गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.


सरकारी शाळांमध्ये नव्याने रूजू होणाऱ्या शिक्षकांना मला सांगावेसे वाटते की, आपण शिक्षणामध्ये अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करूया. आपल्याकडे येणारी मुले ही कदाचित त्यांच्या पिढीतील शिक्षण घेणारी पहिलीच पिढी असेल. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे त्यांची ही पिढी व पुढील पिढ्या नक्कीच बदलणार आहेत. त्यांची जबाबदारी घेऊन, आपल्यालाच त्यांचे आई-वडील व्हावे लागणार आहे. केवळ पुस्तकी ज्ञानच पुरेसे नाही तर त्यांच्यामध्ये विविध कौशल्यांचा विकास करणे सुद्धा गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण देऊन येणाऱ्या काळासाठी तयार करूयात.


217 views0 comments

Comments


bottom of page