शिक्षकांचे किस्से: प्रणाली देशमुख, पिंपरी चिंचवड
Updated: Jul 3, 2024
मी प्रणाली देशमुख पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या, काळेवडी कन्या शाळेतील शिक्षिका. मी इयत्ता पहिलीच्या वर्गाला शिकवते. मी बारावीला असताना ‘बालमानसशास्त्र’ हा विषय घेतल्यामुळे मुलांचे मानसशास्त्र जाणून घेण्याची आवड व जिज्ञासा मला निर्माण झाली. या जिज्ञासेमुळेच मी शिक्षण क्षेत्र निवडले आणि मुलांचे मन, मेंदू आणि शिक्षण यांचा जवळून अभ्यास करण्यासाठी मी शिक्षक होण्याचे ठरविले.
माझ्यामते शिक्षणाचा हेतू ‘शाश्वत जीवन विकास’ आहे. या हेतूने माझ्या हातून एक पिढी घडावी, सुरक्षित, सुसंस्कृत, देशप्रेमी व प्रामाणिक नागरिक तयार व्हावेत. आपल्या देशाच्या विकासासाठी योगदान देणारे शास्त्रज्ञ तयार व्हावेत असे वाटते म्हणून मला शिकवायला आवडते.
मुलांचे जडण-घडण होतांना त्यांना प्रत्येक टप्यावर योग्य मार्ग दाखविण्याचा आनंद काही वेगळाच असतो. निरागस मुलांच्या सानिध्यात मन नेहमी प्रसन्न राहते म्हणून मला हे क्षेत्र आवडते.
कोरोना काळात, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लीडरशिप फॉर इक्विटि यांच्याकडून मला नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल प्रशिक्षण मिळाल्यामुळे अध्यापनात उपयुक्त वापर करण्यास मला मदत झाली. कोविड काळात गूगल मीटचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस मदत झाली.
LFE टीमने वेळॊवेळी वर्गभेट देऊन माझ्या वर्गातील चांगल्या गोष्टींचे कौतुक करून मला प्रोत्सहन दिले. त्यामुळे माझा शिकवण्याचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला. ‘शिक्षक मित्र’ प्रकल्पात वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन व प्रोत्सहन मिळाल्यामुळे अध्यापन अधिक चांगले होण्यास मदत झाली.
आपल्या सार्वजनिक शिक्षण क्षेत्रात तीन गोष्टींवर प्रामुख्याने काम करावे असे मला वाटते जसे की, डिजिटल अध्ययन व अध्यापन, कृतीयुक्त अध्यापन आणि शिक्षणात कलेचे महत्व.

























Comments